सर्व नियम जपून श्री महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी खुले!
कोरोना संसर्ग आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउन मुळे तब्बल 9 महिन्यांनी श्री महालक्ष्मी मंदिर पाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाविकांसाठी खुले करण्यात आले. राज्यातील सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र मंदिरात दर्शन घेताना संबंधित प्रशासनाने काही नियमावली तयार केली आहे ज्याचे पालन करणं अनिवार्य आहे.
बेसावध राहून चालणार नाही
नागरिकांना केलेल्या आवाहनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी म्हटलं की, ”दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही.”
महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.
लॉकडाउनच्या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवे मधील कर्मचारी, वॉर्ड बॉय आणि नर्सेस ‘देव’ रूपाने भक्तांची काळजी वाहत होते. पण पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.
हार, फुले, ओटी आणू नयेत, सामूहिक पूजेसाठी मनाई
एका विशिष्ट वेळेत भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. मंदिरात गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी मंदिर प्रशासनाने घेतली असून हॅन्ड सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, थर्मामीटरवर तापमान चेक करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. अनेक महिन्यांनंतर मंदिर उघडले असल्याने भाविक आपल्या लाडक्या देवीच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत.
शासनाने सर्व धार्मिकस्थळं सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे देवीला हार, ओटी साहित्य आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पुजारी व मानकरी हे महालक्ष्मी देवीच्या सर्व धार्मिक विधी व पुजा सरकारने दिलेल्या कोविड नियमानुसार करतील. भाविकांना देवीचे अभिषेक व इतर पूजा करता येणार नाही, मात्र मुख दर्शन घेता येणार आहे. सामुहिक आरती करता येणार नसुन महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाही. मंदिर सुरू झाल्याने भाविकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन श्री महालक्ष्मी मंदिर समितीच्या वतीने काण्यात आले आहे.
भाविकांनी योग्य काळजी घेऊन दर्शन घ्यावं
भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे बंधनकारक आहे. अनेक बंधने जरी असली तरी देवीच दर्शन घेता येत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खबदारी म्हणुन मंदिर वेळोवेळी सॅनिटाईज केलं जात आहे. त्याच बरोबर मंदिरात कुणालाही बसण्यासाठी परवानगी नसणार आहे. त्यामुळे भाविकांनी योग्य काळजी घेऊन दर्शन घ्यावं.